चंद्रपूर:- वर्धा नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावात ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी राजू कोडापे हे आपली मुलगी अर्पिता आणि भाची प्रियांका हिच्यासह गावाजवळील वर्धा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काल रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली होती. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आणि दुर्दैवाने तिघांचेही मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.


