Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वासुमना पंत यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंधनाच्या तुटवड्याबाबत विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पेट्रोल पंपांवर गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जाहीर करत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या १६६ पेट्रोल पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या ६ लाख २२ हजार लिटर पेट्रोल आणि ५ लाख ६२ हजार लिटर डिझेलचा साठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गरजेनुसार इंधनाची नियमित रिफिलिंग देखील सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही तुटवड्याची परिस्थिती नाही.


सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, घाईघाईने इंधनाचा साठा करून ठेवू नये, असे जिल्हाधिकारी वासुमना पंत यांनी म्हटले आहे. केवळ प्रशासनाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि कोणत्याही चुकीच्या मेसेजला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.