Sudhir Mungantiwar: मातृशक्तीचा खंबीर आधार : महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणारे लोकनेते सुधीरभाऊ

Bhairav Diwase

समाजाच्या प्रगतीचा खरा मापदंड कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे एकच उत्तर आहे
...समाजातील महिलांची सुरक्षितता, सन्मान आणि सक्षमीकरण. ज्या समाजात स्त्री सक्षम असते, तो समाज अधिक प्रगत, अधिक सुसंस्कृत आणि अधिक समृद्ध असतो. याच विचाराला कृतीची जोड देत महिलांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणजे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार.
राजकारणात अनेक नेते येतात; अनेक आश्वासने दिली जातात. पण काही नेते असे असतात, जे प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी सामान्य माणसाला ठेवतात. सुधीरभाऊंच्या सार्वजनिक जीवनाचा विचार केला तर युवक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्याबरोबरच राज्यातील माता-भगिनींचे प्रश्न सोडविणे ही त्यांची कायमची प्राथमिकता राहिली आहे. महिलांच्या शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, सुरक्षिततेपासून स्वावलंबनापर्यंत आणि सन्मानापासून नेतृत्व विकासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने काम केले आहे.
राज्याचे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी अर्थसंकल्पाला केवळ आकड्यांचे पुस्तक न ठेवता महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे प्रभावी साधन बनविले. महिलांच्या कल्याणासाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदी, नवीन योजना, विद्यमान योजनांचा विस्तार आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देत त्यांनी महिला सक्षमीकरणाला प्रत्यक्ष बळ दिले.
चंद्रपूर जिल्ह्याबाबत त्यांचे योगदान तर विशेष उल्लेखनीय आहे. वेकोलिच्या सीएसआर निधीतून चंद्रपूर तालुक्यातील २२ जिल्हा परिषद शाळांमधील ५५३ विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सोपा केला. चंद्रपूर येथे सुमारे ₹२५४ कोटी ६८ लाख ५८ हजार खर्चून महिला रुग्णालय आणि निवासी इमारतीचे काम मंजूर करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बल्लारपूरमध्ये मुलींसाठी पहिली डिजिटल शाळा उभारण्याचा निर्णय असो, मुल येथे आदिवासी मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा उपक्रम असो किंवा जिल्ह्यातील एक हजार अंगणवाड्या स्मार्ट आणि आदर्श करण्याचा निर्णय असो..प्रत्येक निर्णयामागे महिलांचे आणि मुलींचे उज्ज्वल भविष्य हा एकच विचार दिसून येतो.
जंगल परिसरातील नव्वद गावांतील प्रत्येक कुटुंबाला मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा केवळ पर्यावरणपूरक नव्हता, तर धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून गृहिणींना दिलासा देणारा आणि वन्यजीवांच्या धोक्यापासून महिलांचे संरक्षण करणारा मानवी दृष्टिकोनाचा निर्णय होता.
महिलांच्या सेवाशर्ती अधिक सन्मानजनक करण्यासाठीही त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसूती रजेचा लाभ मिळावा, हा निर्णय महिलांच्या हक्कांचा सन्मान करणारा होता. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानांतर्गत 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेसाठी ₹२०० कोटींची तरतूद करून मुलींच्या भवितव्याला आर्थिक आधार देण्यात आला. महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ उभारण्याचा निर्णय आणि त्यासाठी ₹२०० कोटींची तरतूद ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला महिलांच्या माध्यमातून बळकटी देणारी दूरदृष्टी होती.
मुलींच्या वसतिगृहांसाठीचा निधी दुप्पट करून ₹११२ कोटींची तरतूद, सर्व वसतिगृहांना संरक्षक भिंतींसाठी ₹२५ कोटींची तरतूद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ, थकीत व चालू वर्षाची भाऊबीज भेट, वाढीव मानधनासाठी दरवर्षी ₹१७६ कोटींची अतिरिक्त तरतूद हे निर्णय लाखो महिला कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणारे ठरले.
महिलांना व्यावसायिक वाहनचालक म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी आय-केअर संस्थेसोबत सामंजस्य करार करून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. मोठ्या शासकीय कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी 'हिरकणी कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय हा कार्यरत मातांच्या गरजांची संवेदनशील दखल घेणारा होता.
त्यांनी मनोधैर्य योजना, सबला, किशोर शक्ती योजना, सुधारित बालसंगोपन योजना, 'माहेर' योजनेतील अनुदानवाढ करत अशा अनेक योजनांनी संकटग्रस्त, निराधार, परित्यक्ता, घटस्फोटित, अत्याचारग्रस्त महिलांना नवजीवनाची आशा दिली.
अर्थसंकल्पातून त्यांनी विधवा महिलांच्या रोजगारासाठी स्वतंत्र योजना, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांतील लाभवाढ, महिलांसाठी स्वच्छतागृहे, स्वतंत्र तेजस्विनी बस सेवा, बचतगटांसाठी तेजस्विनी प्रकल्प आणि पुनर्विवाहानंतरही विधवा महिलेची पेन्शन कायम ठेवण्यासारखे संवेदनशील निर्णय जाहीर केले. हे निर्णय केवळ योजनांची घोषणा नव्हते, तर महिलांच्या आत्मसन्मानाचा गौरव होते.
सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला दिनानिमित्त विधानसभेत झालेल्या चर्चेतही सुधीरभाऊंनी महिलांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करणे, सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर उपाययोजना, विद्यार्थिनींसाठी जागरूकता अभियान, महिला सहकारी संस्थांना अधिक संधी, महिला लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण, महिलांसाठी औद्योगिक क्षेत्र उभारणे अशा अनेक विधायक मागण्या त्यांनी सभागृहात मांडल्या. त्यांच्या या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी अनेक महत्त्वपूर्ण आश्वासने सभागृहात दिली. हे सुधीरभाऊंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचेच यश म्हणावे लागेल.
नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनातही त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा ठामपणे मांडला. तसेच चंद्रपूर येथे 'सखी निवास', 'शक्ती सदन' अथवा 'जिजाऊ वसतिगृह' यापैकी कोणत्याही योजनेअंतर्गत महिलांसाठी सुरक्षित वसतिगृह मंजूर करण्याची प्रभावी मागणी करून त्यांनी जिल्ह्यातील महिलांच्या गरजांकडे शासनाचे लक्ष वेधले.
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासाठी महिला सक्षमीकरण हा केवळ राजकीय विषय नाही; ती सामाजिक बांधिलकी आहे. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते, कुटुंब सक्षम झाले तर समाज आणि राष्ट्र सक्षम होते, या विचारावर त्यांची अखंड श्रद्धा आहे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये मातृशक्तीबद्दलचा आदर, संवेदनशीलता आणि विकासाची व्यापक दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना एवढेच म्हणावेसे वाटते
,लोकप्रतिनिधी म्हणून अनेकांनी काम केले, अनेक करतील; परंतु महिलांच्या सन्मानाला, सुरक्षिततेला आणि सक्षमीकरणाला शासनाच्या धोरणांच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे कार्य ज्यांनी सातत्याने केले, त्या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. पक्ष संघटनेत काम करताना देखील खंबीरपणे सुधीर भाऊ आम्हा महिला पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात एक भाऊ म्हणून त्यांचा मोठा आधार आम्हाला आहे.
मातृशक्तीच्या सन्मानासाठी, महिलांच्या स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटणाऱ्या या लोकनेत्यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


*अलका आत्राम*
महामंत्री भाजपा महिला मोर्चा
महाराष्ट्र प्रदेश