Video Viral: प्रशासनाचा दावा कागदावर, शेतकरी चिखलात!

Bhairav Diwase
चंद्रपुरात पांदण रस्त्यामुळे बैल रुतला, पाहा थरारक व्हिडिओ
चंद्रपूर:- जिल्ह्यात तब्बल सहा हजार पांदण रस्त्यांची कामे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्ष ग्राऊंड झिरोवर ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

धीडशी गावात घडला प्रकार:

राजुरा तालुक्यातील धीडशी येथील एका शेतकऱ्याला या दुरवस्थेचा मोठा फटका बसला. शेतात काम करण्यासाठी बैलगाडी घेऊन जात असताना पांदण रस्त्यावरील खोल चिखलात बैल अक्षरशः पूर्णपणे रुतला. रुतलेल्या बैलाला आणि गाडीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याला मोठी धडपड करावी लागली.

प्रशासनाने ६ हजार रस्ते केल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात साधी बैलगाडीही शेतात जाऊ शकत नाही. पावसाळ्यात शेतीची कामे कशी करायची? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांची मागणी:

खत, बियाणे आणि शेतीचे साहित्य शेतात नेणे व तयार माल बाहेर आणणे या रस्त्यांमुळे अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारी न दाखवता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करावी आणि या खराब पांदण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून बारमाही रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.