Chandrapur News: चंद्रपुरात दीक्षाभूमी मुक्तीसाठी आंबेडकरी जनतेचा आक्रोश मोर्चा!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या संवर्धन आणि विकासासाठी चंद्रपुरात आंबेडकरी जनतेच्या वतीने भव्य 'आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. मागील ३६ वर्षांपासून चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावर एकाच कुटुंबाची पकड असल्याचा आरोप आंबेडकरी जनतेकडून‌ होत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे पुनर्गठन करून सर्वसमावेशक समिती स्थापन करावी. ऐतिहासिक बुद्ध विहाराचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आधुनिकीकरण केले जावे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा बौद्ध जनतेच्या पुढाकाराने आयोजित करण्याची परवानगी मिळावी. मागील ३५ वर्षांच्या धम्मदानाचा हिशोब जाहीर करण्यात यावा. या मागणीसाठी मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने युवक व आंबेडकरी जनता उपस्थित होते.