सावली:- येथील गाव तलावावर गौरी विसर्जनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १५) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात आठ महिला जखमी झाल्या असून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गौरी विसर्जन सोहळ्यासाठी सकाळी तलाव परिसरात महिलांची मोठी गर्दी जमली होती. तलावाच्या पाळीवर असलेल्या एका वडाच्या झाडावर मधमाश्यांचे मोठे मोहळ होते.
विसर्जनाची लगबग सुरू असतानाच मधमाश्या उठल्या आणि त्यांनी उपस्थित महिलांवर हल्ला चढवला. मधमाश्यांचा हल्ला होताच बचावासाठी महिलांची सैरावैरा पळापळ झाली. हल्ल्यात जखमी झालेल्या तातडीने सावली येथील महिलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, हल्ल्यामुळे उडालेल्या प्रचंड गोंधळात रुपाली सत्यवान कोसरे यांचा सोन्याचा दागिना हरवला असून त्याचा शोध सुरू आहे.
