Chandrapur: राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

Bhairav Diwase
हॉस्टेलच्या जेवणात झुरळ, अळ्या उंदराची विष्ठा आणि चक्क उंदराचे अवशेष?

चंद्रपूर:- बाबूपेठ येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ खेळला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 

हॉस्टेलच्या जेवणात चक्क झुरळ, मेलेल्या अळ्या, किडे आणि आता तर थेट उंदराची विष्ठा तसेच मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. या निकृष्ट जेवणाविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक पाऊल उचलत गेल्या २४ तासांपासून जेवणावर बहिष्कार टाकला असून महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील भोजनाचा दर्जा खालावल्याची तक्रार बऱ्याच दिवसांपासून करत होते. मात्र, परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार, कधी ताटात झुरळ, कधी नाश्त्यामध्ये मेलेल्या अळ्या, तर कधी वरणामध्ये किडे आढळले. पण आजचा प्रकार हद्दपार करणारा होता, कारण जेवणात चक्क उंदराची विष्ठा आणि मेलेल्या उंदराचे अवशेष आढळून आले.


या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार तक्रार करूनही महाविद्यालय प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून केला जात आहे. विशेष म्हणजे, दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी प्रशासन त्याची पाठराखण करत असल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. हा संबंधित अन्न पुरवठा कंत्राटदार तात्काळ बदलाण्यात यावा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार अन्न पुरवले जावे, हीच एकमेव प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे.


एका बाजूला विद्यार्थ्यांचे पोटतिडकीने आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे महाविद्यालय प्रशासनाने या सर्व प्रकरणावर अत्यंत संतापजनक आणि बेजबाबदार स्पष्टीकरण दिले आहे. हॉस्टेलमध्ये दररोज ३०० ते ४०० विद्यार्थिनींसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक केला जात असल्याने, जेवणात एखादा किडा पडणे ही सामान्य बाब आहे, असे अजब तर्क प्रशासनाकडून लढवले जात आहेत.