मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर शांततामय ठिय्या आंदोलन
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि ग्रामस्थांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शांततामय ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या मुजोरीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने विविध प्रलंबित व महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी 'विशेष ग्रामसभा' बोलावण्यात यावी, अशी मागणी करणारे मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात आले होते. मात्र, हे निवेदन देऊन १० दिवसांचा मोठा काळ लोटूनही ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावण्याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. प्रशासनाच्या या टोलवाटोलू आणि उदासीन धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरली आहे.
ग्रामसभेची योग्य व नियमानुसार पूर्वसूचना सर्व ग्रामस्थांना देणे, ग्रामस्थांच्या अडीअडचणी व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ग्रामपंचायतीच्या एकूणच कारभारात पारदर्शकता राखणे, या ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या आहेत. परंतु, ग्रामस्थांच्या या न्याय्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, "ग्रामपंचायत ही काही ठराविक व्यक्तींची नसून ती सर्व ग्रामस्थांची आहे. ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांना बगल देऊन चालणारा मनमानी कारभार आता अजिबी सहन केला जाणार नाही. आमचा हा लढा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरोधा नसून, केवळ पारदर्शक आणि उत्तरदायी ग्रामपंचायत कारभारासाठी आहे."
सध्या कोठारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या शांततामय ठिय्या आंदोलनामुळे स्थानिक राजकारण तापले असून, यावर ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेणार आणि विशेष ग्रामसभा कधी बोलावणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
