Chandrapur News: KVR कंपनीमध्ये खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

Bhairav Diwase
चंद्रपूर:-  चंद्रपूर शहरालगत असलेल्या वरवट येथील KVR कंपनीत थेट घुसून कंपनीच्या मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


 वरवट येथील KVR कंपनीत काही इसम आले. त्यांनी कंपनीचे मॅनेजर साईप्रकाश गाजुला यांच्याकडे जाऊन थेट दमदाटी केली. जर ही कंपनी चालवायची असेल, तर दरमहा पन्नास हजार रुपयांचा हप्ता (खंडणी) द्यावाच लागेल, अशी मागणी या लोकांनी केली. एवढ्यावरच न थांबता, जर पैसे दिले नाहीत तर मॅनेजरला संपवून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.


या प्रकाराची गंभीर दखल घेत मॅनेजर साईप्रकाश गाजुला यांनी तत्काळ दुर्गापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या काही वेळातच या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अजय कुचनकर, सुमित रामटेके आणि पवन जाधव अशी अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी BNS (भारतीय न्याय संहिता) च्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुर्गापूर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. कंपनीत घुसून थेट खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या रॅकेटमागे आणखी कोणा-कोणाचा हात आहे? याचा कसून शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.