कायदे क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे वाढते महत्त्व; चंद्रपूर बार असोसिएशनतर्फे विशेष चर्चासत्र संपन्न.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास न्यायव्यवस्था अधिक सक्षम- डॉ. पलक शर्मा
चंद्रपूर:- ( राहुल थोरात ) चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन आणि कलिंगा विद्यापीठ नवा रायपूर ( छत्तीसगढ) यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ॲड. विजय एस. सकदेव व स्व. ॲड.. दिवाकर एन. बुरीले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या रूम क्रमांक १२ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. ॲड. विजय एस. सकदेव व स्व. ॲड. दिवाकर एन. बुरीले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आजच्या डिजिटल युगात कायदेशीर संशोधन (Legal Research) केस अॅनालिसिस तसेच न्यायालयीन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर कसा करता येऊ शकतो. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कायदे क्षेत्रातील कामकाज अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक पद्धतीने करता येते असे मत मार्गदर्शकांनी व्यक्त केले.
या चर्चासत्रासाठी डॉ. पलक शर्मा यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. तसेच कु. विशाखा साखळकर व त्यांच्या टीमनेही या विषयावर माहितीपूर्ण सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थित वकीलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा कायदे व्यवसायात कसा उपयोग करून घेता येईल याची सखोल माहिती मिळाली.
कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम टंडन, उपाध्यक्ष ॲड. अमन मारेकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ व युवा वकील उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ वकीलांच्या हस्ते डॉ. पलक शर्मा व कु. विशाखा साखळकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन बार असोसिएशनचे सचिव ॲड. अभिजित किन्हीकर यांनी केले तर आभार बारचे ग्रंथपाल ॲड. राहुल थोरात यांनी मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
कायदे क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता अशा प्रकारची मार्गदर्शनपर चर्चासत्रे वकिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित वकीलांनी व्यक्त केले.


