Chandrapur News: गोंडवाना विद्यापीठ युवा महोत्सवात सरदार पटेल महाविद्यालयाचा दबदबा

Bhairav Diwase
१६ स्पर्धांत प्राविण्य मिळवत 'जनरल चॅम्पियनशिप'वर कोरले नाव
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाद्वारे आंतर महाविद्यालयीन युवा सांस्कृतिक महोत्सवात येथील सरदार पटेल महाविद्यालयाने भरारी घेतली आहे. १६ विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करीत सर्वोत्कृष्ट विजेतेपदाचा चषक पटकावला आहे. दरम्यान सलग दोनदा सर्वोत्कृष्ट विजेतेपदाची ट्रॉफी महाविद्यालयाला मिळालेली आहे.


गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे यावर्षी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव भरारी २०२६ चे तीन दिवसीय आयोजन नुकतेच विद्यापीठात करण्यात आले होते. या महोत्सवात संगीत, नृत्य, नाटक, ललित कला, साहित्य विषयांमध्ये निरनिराळ्या एकूण २४ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्वोत्कृष्ट विजेतेपदाची ट्रॉफी सरदार पटेल महाविद्यालयाने पटकाविली आहे.


या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी या यशामागे मुलांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याचे नमूद करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांच्यासह उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अजय बेले व समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे आदींनी या यश संपादन करणाऱ्या विद्यार्थांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.