Amalnala Dam: गडचांदूरकरांनो सावधान! अमलनाला धरणाचे पाणी हिरवे

Bhairav Diwase
कोरपना:- गडचांदूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमलनाला धरणातील पाणी अचानक हिरवट रंगाचे झाले आहे. यामुळे सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-कोरपना भागातील महत्त्वाचा जलप्रकल्प असलेल्या अमलनाला धरणाचा रंग अचानक बदलल्याचे समोर आले आहे. धरणातील पाणी हिरवेकंच झाल्याने नागरिकांचे लक्ष याकडे गेले. विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वीही या धरणातील पाणी अशाच प्रकारे हिरवे झाले होते. मात्र, त्या वेळी हे पाणी प्रामुख्याने शेती आणि स्थानिक उद्योगांसाठी वापरले जात होते.


परंतु, वर्ष २०२२ पासून याच धरणातून गडचांदूर या ५० हजार लोकसंख्येच्या शहराला नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याचाच रंग बदल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचांदूर नगरपरिषदेने तात्काळ पाऊल उचलले आहे. "जोपर्यंत पाणी तपासणीचा स्पष्ट अहवाल येत नाही आणि परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी हे पाणी पिण्यासाठी वापरू नये," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


पाण्याचा रंग नेमका कशामुळे बदलला? औद्योगिक सांडपाणी वा रसायने मिसळल्यामुळे हा प्रकार घडला, की धरणात शेवाळाची (Algae) अतिवृद्धी झाली आहे? या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही ना? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित होत आहेत.


सध्या संबंधित विभागाकडून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच यामागचे खरे कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत गडचांदूरकरांनी काळजी घेणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.