Vinod Deshmukh: गोसीखुर्दच्या निकृष्ट पाइपलाइनची तत्काळ दुरूस्ती करा

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटल्या आहेत. या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी पं.स. माजी उपसभापती विनोद देशमुख यांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

पाणी टंचाईपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे पाणी पाइपलाइनद्वारे काही गावांपर्यंत पोहचवण्यात आले आहे. पाणी उपलब्ध झाल्याने सिंचनाचा प्रश्न सुटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटल्याने अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही, तर दूसरीकडे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर, निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व पाईपलाईनची दुरुस्ती करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.