Top News

महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा जनक देवेंद्र फडणवीस!




मुंबई:- स्वात़ंत्र्यानंतर भारताच्या राजकारणाचा तोंडावळा बदलणारी पर्वं आपल्या देशाने अनुभवली आहेत.पं.जवाहरलाल नेहरु-सरदार वल्लभभाई पटेल पर्व,"इंडिकेट-सिंडिकेट"असे नामाभिधान लाभलेले इंदिरा गांधी पर्व, जयप्रकाश नारायण पर्व,राजीव गांधी पर्व, अटलबिहारी वाजपेयी पर्व, सोनिया गांधी पर्व आणि ताजे नरेंद्र मोदी पर्व,अशी नावे त्या पर्वांना देता येतील.त्या प्रत्येक पर्वाने आपल्या देशाच्या राजकारणाला नवा चेहरा दिला.त्या चेहऱ्याच्या रंगांच्या गहराईत सामाजिक, आर्थिक, आंतरराष्ट्रीय आणि भावनिक परिवर्तनाच्या बहुरंगी छटा होत्या! महाराष्ट्राच्या राजकारणानेही तशीच पर्व आजवर आपल्या अंगा-खांद्यावर खेळविली! अगदी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीच्या पूर्वी पासूनचे मोरारजीभाई देसाई -यशवंतराव चव्हाण पर्व त्यानंतर यशवंतराव-वसंतराव नाईक पर्व,शरद पवार पर्व, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे-गोपीनाथ मुंडे पर्व अशी त्या पर्वांना नावे दिली जातात. २०१४ साली सुरु झालेले नव्या जमान्याचे पर्व म्हणजेच देवेंद्र फडणवीस पर्व ! देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक पर्वाचा एक नायक होता.नवा व्यापक दृष्टिकोन, बहुआयामी व्यक्तिमत्त्व, चौफेर अभ्यास असणारी अर्थशास्त्रीय बैठक आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा ही त्या धारकांची बलस्थाने होती. जी नव्या पर्वाचे जनक देवेंद्र फडणवीस यांचीही आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार पर्व आणि देवेंद्र फडणवीस पर्व या पर्वांचे मात्र वेगळे वैशिष्ट्य आहे. या दोन्ही पर्वांनी अगदी गावपातळीपासूनची राजकीय-सामाजिक संस्कृतीच बदलून टाकली!
१९७७-७८ सुरु झालेल्या शरद पवार पर्वाने राजकीय तत्त्व आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची व्याख्याच बदलली! पवार पर्वाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहराच बदलून टाकला होता.देवेंद्र फडणवीस पर्वानेही गावपातळीवर राजकीय संस्कृतीत बदल केल्याचा अनुभव आपण सध्या घेतोय.हा बदल महाराष्ट्राचे सामाजिक-आर्थिक सामर्थ्य वाढविणारा ठरविण्याची क्षमता देवेंद्र यांच्यात आहे. त्याच क्षमतेमुळे महाराष्ट्राला सर्वच आघाड्यांवर बलशाली बनविण्यात ते कुठेही कमी पडणार नाहीत याची खात्री उभ्या महाराष्ट्राला वाटते. २२ जुलै हा देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस.महाराष्ट्राच्या नव्या देवेंद्र फडणवीस पर्वाच्या नायकास वाढदिवसाच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा..!

श्री. राजा माने
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने