Chandrapur News: सेल्फी ठरला अखेरचा! पोहण्याचा मोह नडला

Bhairav Diwase
वर्धा नदीत बुडालेल्या पाचही मित्रांचे मृतदेह हाती

चंद्रपूर:- घुग्घुस जवळील म्हातारदेवी गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात बुडालेल्या पाचही मित्रांचे मृतदेह अखेर शोधून काढण्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला यश आले आहे. काल दुपारपासून बेपत्ता असलेल्या या पाचही तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घुस शहरातील इंदिरा नगर परिसरातील रहिवासी असलेले पाच मित्र सोमवार, ८ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीच्या चांदूर घाटावर पोहण्यासाठी गेले होते. नदीत उतरण्यापूर्वी त्यांनी काढलेला सेल्फी हा त्यांचा अखेरचा फोटो ठरला. संध्याकाळ झाली तरी मुले घरी न परतल्याने चिंताग्रस्त पालकांनी शोध सुरू केला. नदीकाठावर मुलांचे कपडे, चप्पल आणि मोबाईल फोन आढळून आल्याने ते नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. रात्री अंधारामुळे शोधकार्यात अडथळे आले, मात्र आज मंगळवारी सकाळी पुन्हा बोटींच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.


या दुर्दैवी घटनेत मृत पावलेले सर्व युवक १५ ते १९ वर्ष वयोगटातील असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

१. सम्यक देवराव सोनटक्के (वय १८)
२. संनी अशोक आस्मपेल्ली (वय १९)
३. रोहित बाबाराव बोबडे (वय १९)
४. शिव (नकुल) भास्कर केलझरकर (वय १९)
५. तन्मय नवनाथ पथाडे (वय १८)


सकाळी शोधमोहीम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला एकाचा आणि त्यानंतर इतर मित्रांचे मृतदेह टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात आले. आता पाचही मृतदेह हाती आले असून, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शोधमोहीम पूर्ण झाल्याचे कळवले आहे. ५ उमद्या तरुणांचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण घुग्घुस शहरात आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मृतकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.