
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असलेले शहापूर (ता. कऱ्हाड) येथील जवान हॅण्ड ग्रेनेडच्या स्फोटात हुतात्मा झाले. अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) असे या जवानाचे नाव आहे. त्यांच्या जाण्याने शहापूरसह परिसरात शोककळा पसरली आहे.
शहापूरमधील अर्जुन जाधव हे गेल्या नऊ वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहेत. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते. सध्या जम्मू- काश्मीरमधील आठ आरआरमध्ये ते कार्यरत होते. उरी सेक्टरमध्ये त्यांची नियुक्ती होती. उरी सेक्टरमध्ये मंगळवारी उशिरा कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ गस्त घालताना भीषण स्फोट झाला. त्यात लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आले. ते दोघेही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यात अर्जुन यांचा समावेश आहे.
अन्य सहकाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी श्रीनगरच्या बदामीबाग येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वीरमरण आलेले दुसरे जवान विक्रम चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील एरोली येथील रहिवासी आहे.
स्फोट नेमका कशामुळे झाला? तो भूसुरुंग होता, की अन्य कोणत्या कारणामुळे झाला? याचा तपास लष्कराकडून केला जात आहे. दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव कायदेशीर प्रक्रियेनंतर लष्करी इतमामात त्यांच्या मूळगावी रवाना केले जाणार आहे. शुक्रवारी (ता. १२) त्यांचे पार्थिव शहापूरला येईल, असे सांगितले जात आहे. अर्जुन यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. त्यांचा लहान भाऊ ऋषी हे नौदलात कार्यरत असून, ते सध्या सुटीवर गावीच आहेत.
मुलाच्या वाढदिवसाचे स्वप्न अपुरे!
अर्जुन यांचा मुलगा सर्वेशचा २५ जूनला पहिला वाढदिवस होत आहे. तो साजरा करण्याची त्यांनी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी ते १५ जूनला सुटीवर घरी शहापूरला येणार होते. मात्र, त्यापूर्वीच झालेल्या दुर्दैवी स्फाेटात त्यांना वीरमरण आल्याने जाधव कुटुंबासह संपूर्ण शहापूरवर शोककळा पसरली आहे.

