Chandrapur News: चंद्रपुरात आतिषबाजी अन् बँडबाजा!

Bhairav Diwase
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर तुकूममध्ये आनंदोत्सव
चंद्रपूर:- देशातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळामुळे आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या असंतोषामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माहिती समोर येताच संपूर्ण देशभरात आणि चंद्रपुरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहेत.


चंद्रपूर शहरातही या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. शहरातील तुकूम परिसरात शेकडो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी बँडच्या तालावर थिरकत आणि फटाक्यांची आतषबाजी करत प्रचंड जल्लोष साजरा केला.


गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. सतत होणारे पेपर लीक आणि अनागोंदी कारभारामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देशभरातून जोर धरत होती. अखेर विद्यार्थ्यांच्या या जनक्रोशापुढे सरकारला झुकावे लागले असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.


या राजीनाम्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच चंद्रपुरातील तुकूम परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी एकत्र येत बँडच्या तालावर ताल धरला आणि ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा विजय मानला जात असून, तुकूम परिसरातील नागरिकांनीही या जल्लोषात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.