चंद्रपूर:- देशभरात तसेच राज्यभरात सद्धा लहान मुलींवर अत्याचार झालेल्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे. याबरोबरच आता चंद्रपूर जिल्ह्यात दोन-तीन दिवसात विनयभंगाच्या 5 घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. चंद्रपूरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनांमुळे पुन्हा समोर आला आहे. महिला सुरक्षेबाबत देशभर चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही अशा निंदनीय घटना रोज समोर येत आहेत. राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असतानाच हा प्रकार समोर आला आणि सर्व चर्चा यावर केंद्रित झाली. 'आम्हाला पैसे नको, सुरक्षा द्या' असे म्हणत काही महिला रस्त्यावर उतरल्या. महिला, चिमुकलींच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा 'अलर्ट मोड'वर आलेली असतानाही नराधमांकडून अत्याचाराचे प्रकार सुरूच आहेत. मागील काही दिवसांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातही सातत्याने अशा घटना उघडकीस येत असल्याने समाजमन सुन्न झाले आहे. या नराधमांच्या टोळींना आवर घालणार कधी अन् लेक लाडकी सुरक्षित होणार कधी?, असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये नागभीड, सिंदेवाही , चिमूर, वरोरा, बल्लारपूर येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील तरुणीला मुलाखतीला नेण्याच्या बहाण्याने उमरेडला नेऊन अत्याचार केल्याची घटना बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी समोर आली. याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी आकाश टेंभुर्णे रा. सिंदेवाही यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS)अंतर्गत ६४ एम २ चा गुन्हा दाखल केला आहे. पीडित २३ वर्षीय युवती आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत उमेरड येथे चारचाकी वाहनाने मुलाखतीसाठी जात होती. दरम्यान तिच्या परिचयाचाच असलेल्या आकाश टेंभुर्णे यांने एकारा गावाजवळ ती चारचाकी थांबवली. तिला आपल्या दुचाकीने उमरेडला घेऊन गेला. त्याने तिला एका लॉजवर अत्याचार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने आपल्या वडिलांना माहिती दिली. त्यांनी सिंदेवाही पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पुढील तपास सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात एपीआय अतुल स्थूल करीत आहेत.
चंद्रपुर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात दुसरीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपी महादेव गोरडवार (वय.५२) असे नाव आहे. आठ वर्षाच्या चिमुकली विद्यार्थिनीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून 52 वर्षीय संशयित आरोपीने विनयभंग केल्याची घटना नागभिड तालुक्यात उघडकीस आली आहे. संशयितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या 53 वर्षीय डेप्युटी स्टेशन मास्टरने चालत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पिडीत विद्यार्थिनी बल्लारपूर ते चंद्रपूर महाविद्यालयात ये-जा करतात. विद्यार्थिनी सकाळी बल्लारपूरहून बस स्थानकावर असताना आरोपी मिर्झा बेग याने त्यांना छेडले. सायंकाळी 5 वाजता विद्यार्थिनींनी घरी परतल्यावर कुटुंबियांना घडला प्रकार सांगितला. संबंधित मुलींचे पालक स्थानकावर पोचले. धक्कादायक म्हणजे आरोपी बेग तिथे हजर होता. त्याने पुन्हा मुलींना छेडण्याचा प्रकार केला. संतापलेल्या कुटुंबीयांनी मिळून रेल्वे अधिकरी बेग याला बेदम मारहाण केली आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यात नेले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपींविरुद्ध पोस्को, 74 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात 2 शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी आरोपी शिक्षकांची नावं आहेत. आपल्या वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावलं होतं. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठीची मागणी केली. तिने घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न करतात बळजबरी करण्यात आली. भीतीने पळून आलेल्या पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या पोलिसांनी वरोरा पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. वरोरा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या विरोधात पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून आरोपी दोन्ही शिक्षकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अंगणवाडीत जात असतांना शाळेसमोरील रस्त्यावर आरोपी अमोल अनिल माहुरे 25 वर्ष राहणार लोहारा यांने पिडीत मुलीला तीच्याकडे असलेल्या बॉटलमधले पाणी मागीतले असता व पिडीत मुलीने पाणी न दिल्याने आरोपीने पीडीताचे पाठीवर चापट मारून व तिचे छातीवर हात लावुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने आरोपी विरुद्ध अप.क्र.156/2024 कलम 115 (2), 74 भारतीय न्याय संहीता, (BNS) सहकलम 8 बालकांचे लैगींक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम 2012 पोक्सो अंतर्गत भिसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद फिर्यादिच्या तोंडी रिपोर्ट वरून करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पो.स्टे. प्रभारी अधिकारी सपोनि. जितेंद्र चांदे, ठाणेदार,पो. स्टे. भिसी यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि.रविंद्र वाघ, पो.स्टे.भिसी करीत आहे.